Ad will apear here
Next
बलसागर भारत होवो...
११ जून हा साने गुरुजींचा स्मृतिदिन. साने गुरुजींच्या वाङ्मयावर अतोनात प्रेम करणारे पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन १२ जून आणि साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर चित्रपटनिर्मिती करणारे आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन १३ जून! ही अशी व्यक्तिमत्त्वं आहेत, की ज्यांच्या नुसत्या नामोच्चारानंही मराठी मनं पुलकित होतात... ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘बलसागर भारत होवो’ या गीताविषयी...
............
साने गुरुजीएके काळी भारताला अंतराळ तंत्रज्ञान देण्यास नकार देणाऱ्या देशांना आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं ‘इस्रो’नं, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं. ‘इस्रो’च्या या कामगिरीबद्दल विविध माध्यमातून सुवार्ता वाचताना, ऐकताना आणि पाहताना साने गुरुजींची ‘बलसागर भारत होवो’ ही कविता आठवली. तीन टनापेक्षा अधिक वजनाच्या उपग्रहाचं ‘इस्रो’नं केलेलं यशस्वी प्रक्षेपण ही अवघ्या भारत देशाला गौरवांकित करणारी घटना! २.३ टनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी यापूर्वी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागायचं. आता चार टन वजनाचे उपग्रहसुद्धा अवकाशात सोडता येतील. आता भारत या क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला आहे. ‘जीसॅट १९’ या उपग्रहामुळे संपर्क-तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होणार. इंटरनेटचा वेग वाढणार... पाच जून २०१७ हा तो दिवस... बलशाली राष्ट्र होण्यासाठी भारतानं आणखी एक पाऊल उचललं. याच दिवशी या ऐतिहासिक क्षणांचे साक्षी होताना, शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांचं सार्थक होताना कानामनात एकच कविता गुंजत होती, ती म्हणजे ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनि राहो।।’

११ जून हा साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांचा स्मृतिदिन... साने गुरुजींना विनम्र अभिवादन करताना प्रत्येक शास्त्रज्ञ जणू सांगत होता ‘गुरुजी! बलसागर भारताचं तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’ खरं म्हणजे फक्त शास्त्रज्ञांनीच नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकानं बलशाली भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध झालं पाहिजे, हाती कंकण बांधलं पाहिजे...

हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो,

साने गुरुजींनी लिहिलेलं हे स्फूर्तिगीत पिढ्यान् पिढ्या स्फूर्ती देत राहणार. साने गुरुजींच्या वाङ्मयावर अतोनात प्रेम करणारे पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन १२ जून आणि साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर चित्रपटनिर्मिती करणारे आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन १३ जून! हा केवळ योगायोग नाही का? दिव्यानं दिवा लावावा तशा या पावन स्मृतींच्या ज्योती आत्ता या क्षणी मनात उजळू लागलेल्या आहेत. साने गुरुजी, पु. ल. देशपांडे आणि आचार्य प्र. के. अत्रे... महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिमत्त्वं... ज्यांच्या नुसत्या नामोच्चारानंही मराठी मनं पुलकित होतात...

पु. ल. देशपांडेमला आठवतंय साने गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त साने गुरुजींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी ‘पुलं’ अमळनेरला आले होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या ‘पुलं’ना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमलेला... ‘जे जे मंगल, उदात्त, पवित्र ते स्वीकारा’ असं सांगणाऱ्या साने गुरुजींच्या स्मृती जागवणारं ते निमित्त होतं. अक्षरश: कानात प्राण आणून प्रत्येक जण ऐकत होता ‘पुलं’चं भाषण... भारलेल्या आणि भारावलेल्या स्थितीत... ‘पुलं’चे शब्द काळजावर कोरल्यासारखे झाले. ‘पुलं’ म्हणाले, ‘काही लोकांना साने गुरुजींचं वाङ्मय रडकं वाटतं; पण ते रडकं नाही, तर त्यांचं वाङ्मय वाचून डोळ्यांत जे अश्रू येतात, ते अश्रू मनाला स्नान घालतात... म्हणून ते अश्रू, अश्रू नाहीत तर तीर्थ आहे. शरीराला स्नान घालतं ते पाणी, पण मनाला स्नान घालतं ते तीर्थ! आणि त्या तीर्थाची प्रचिती साने गुरुजींच्या वाङ्मयातून येते!’ ‘पुलं’चे ते शब्द आजही आठवले, तरी डोळ्यांत अश्रू उभे राहतात...साने गुरुजींची कविता आठवते... 

नको माझे अश्रू, कधी नेऊ देवा
हाचि थोर ठेवा, माझा एक।
बाकी सारे नेई, धन, सुख, मान
परी हे लोचन, राखी ओले ।।

साने गुरुजींचं वाङ्मय वाचलं नाही, असं मराठी घर कुठे सापडणार नाही. साने गुरुजींचं साहित्य, त्यांची कविता, त्यांचं गाणं माहीत नाही, असा मराठी माणूस सापडणार नाही. किंबहुना प्रत्येक मराठी माणसाचं वैभव म्हणजे साने गुरुजी, ‘पुलं’ आणि आचार्य अत्रे यांचं साहित्य, असं वाटतं...

इवलासा अश्रू, परी त्याच्या पोटी
कोट्यवधी गोष्टी, साठलेल्या
इवलासा अश्रू, परी बोले किती
देवी सरस्वती, तेथे मूक।

हे अश्रूंचं मोल साने गुरुजींनी आपल्या साहित्यातूनच नाही, तर अवघ्या जीवनभर जपलं. दीनदलितांसाठी कळवळा, मुलां-फुलांप्रती लळा म्हणजे साने गुरुजी ! ‘वारा वदे कानामध्ये, हस रे माझ्या मुला’ असं सांगणारी, मुलांमध्ये रमणारी त्याची कविता प्रभूशी नातं जोडू पाहणारी होती... ‘करी रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे,’ असा ठाम विश्वास साने गुरुजींना होता. मुलांविषयी प्रेम, तसंच देशप्रेमही उत्कट... ते प्रकट करण्यासाठी लेखणी आणि कृती सदैव सज्ज!

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो।

देशभक्ती जागवणाऱ्या अशा कविता त्यांनी लिहिल्या, त्याबरोबरच गावोगावी भाषणं दिली... जातीपातीच्या, उच्चनीचतेच्या भावना समूळ नष्ट व्हाव्यात म्हणून चळवळ उभी केली. पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर सर्वांसाठी खुलं व्हावं म्हणून उपोषण केलं. आणि पांडुरंग सर्वांचाच होता तो प्रत्यक्ष सर्वांचा झाला. साने गुरुजींच्या नावातच ‘पांडुरंग’ होता. आषाढीचा उपवास सोडताना कृतज्ञ भावनेनं साने गुरुजींचंही स्मरण करायला हवं. सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे साने गुरुजी म्हणत ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.’ खरंच ही कविताच साने गुरुजी जगले. जे सांगायचं, ते करायचंही; हीच खरी भारतीय संस्कृती. ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथात त्यांनी संयमाविषयी सांगताना सुंदर उदाहरण दिलंय ते असं. ‘सतार घ्या. सतारीला तारा असतात. त्या तारा नुसत्या जमिनीवर ठेवा. त्या तारांवर बोट फिरवा. त्यातून ध्वनी बाहेर पडणार नाही, त्या तारांतून संगीत बाहेर पडणार नाही. परंतु त्या तारा सतारीच्या खुंटीला बांधा मग त्या बंधनात बांधलेल्या तारांतून डोलविणारे संगीत स्रवू लागते. त्या जड तारा चिन्मय होतात. त्यातून अपरंपार माधुरी पाझरू लागते. संयमातून संगीत प्रकट होते.’

आचार्य अत्रेसाने गुरुजींचे विचार आणि वाङ्मय म्हणजे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं. त्यांची ‘श्यामची आई’ ही कादंबरी म्हणजे मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र. आज १३ जून, आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन. आचार्य अत्रे वक्ता दशसहस्रेषु, नाटककार, पत्रकार, कवी आणि लेखक याबरोबरच चित्रपटनिर्माते म्हणूनही प्रसिद्ध झाले ते ‘श्यामची आई’ या चित्रपटामुळे. पहिलं सुवर्णकमळ प्राप्त करणारा चित्रपट ‘श्यामची आई!’ साने गुरुजींनी लिहिलेलं महन्मंगल स्तोत्र आबालवृद्धांच्या काळजावर कोरलं गेलं. याचं श्रेय आचार्य अत्रे यांना आहे.

बलशाली भारत होण्यासाठी माध्यमांचीही ताकद विसरता कामा नये. मग ते नाटक असो की चित्रपट, आकाशवाणी असो की दूरदर्शन, वर्तमानपत्र असो की ई-पेपर! मनामनात देशभक्ती जागवणारी गाणी या माध्यमांनी दिली. त्यातीलच साने गुरुजींची ‘बलसागर भारत होवो’ ही कविता वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केली आणि वाणी जयराम यांच्यासह आकाशवाणीच्या वाद्यवृंदानं सादर केली. साने गुरुजींची ही कविता अशी स्वरांनी मोहरली आणि एक उत्कृष्ट स्फूर्तिगीत ठरली.

करी भव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
बलसागर भारत होवो... 
या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
बलसागर भारत होवो...

साने गुरुजींनी ‘पुरुषार्था’चा खरा अर्थ या स्फूर्तिगीतातून दिलाय. समाजासाठी, देशासाठी शर्थीनं कार्य करणं म्हणजेच खरा पुरुषार्थ! आपल्या दैनंदिन कामातील निष्ठा, प्रामाणिकता  जी देशाला उन्नत करेल, विकासाच्या, प्रगतीच्या दिशेकडे नेईल असं काम प्रत्येकानं केलं पाहिजे. ही अपेक्षा पूर्ण करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांचं संपूर्ण जगात कौतुक होतंय... ‘ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल’ असं साने गुरुजींचं स्वप्न पूर्ण करण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. तेव्हा एकमुखानं हे स्फूर्तिगीत गाऊ या...

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनि राहो...
- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZAGCN
 प्रतिमा, खूप सुंदर लिहिलंयस. 💐2
 नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण, आेघवता लेख3
 खूप छान !सुधीर फडक्यांनी गायलेलं गाणं अर्थ जास्त परिणामकारकरित्या अर्थ पोहोचवतं3
 प्रिय प्रतिमा, लेख खूपच आवडला,
छानच....3
 Ekdam mast3
Similar Posts
माझे जीवनगाणे सात नोव्हेंबर हा पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृतिदिन, तर आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन. याचं औचित्य साधून ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ सदरात आज पाहू या ‘माझे जीवनगाणे’ या मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या, अभिषेकीबुवांनी गायलेल्या आणि ‘पुलं’नी संगीत दिलेल्या गाण्याबद्दल...
हसले मनी चांदणे... भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं, नाट्यगीतं, ख्याल, ठुमरी... असे गाण्याचे कितीतरी प्रकार माणिकताईंच्या स्वरांनी सजलेले आहेत. आज, १६ मे, माणिक दादरकर अर्थात माणिक वर्मा यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’च्या आजच्या भागात माणिक वर्मा यांनी गायलेल्या ‘हसले मनी चांदणे...’ या गीताबद्दल
माझे जीवनगाणे सात नोव्हेंबर हा पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृतिदिन, तर आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन. याचं औचित्य साधून ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ सदरात आज पाहू या ‘माझे जीवनगाणे’ या मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या, अभिषेकीबुवांनी गायलेल्या आणि ‘पुलं’नी संगीत दिलेल्या गाण्याबद्दल...
आखाजीचा मोलाचा सन देखा जी.... आखाजी म्हणजेच अक्षय्यतृतीया! उन्हाचा कहर वाढत असतो, जिवाची लाही लाही होत असताना आखाजीच्या सणाची तयारी स्त्रिया मोठ्या उत्साहानं करतात. आखाजीचा सण खानदेशात विशेष रूपानं साजरा होतो. बहिणाबाई आपलं रोजचं जगणं आपल्या गाण्यांमधून गात असत. यशवंत देवांसारख्या श्रेष्ठतम संगीतकाराने आपल्या प्रतिभावान संगीतकलेचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language